गोष्ट एका आजीची(अंतिम भाग)

 

गोष्ट एका आजीची(अंतिम भाग)


रात्री साधारण दोन वाजले असतील. फोनची रिंग वाजली. नानीने मोबाईल कानाला लावला. तेरेदेसाई बोलत होते.
"भाऊ, एवढ्या रात्री सगळं ठीक ना."

"अं हो नाही. नंदिनी..नंदिनी माझी नंदू ओ..उचक्या येताहेत तिला. काय करु. मधुला उठवाल?"

"भाऊ, आम्ही आहोत ना. आधी शांत व्हा बघू. मी मधुला घेऊन आलेच."

नानीने मधुच्या दारावर थाप मारली.

मधु डोळे चोळत बाहेर आला.

"काय नानी. बरं वाटत नाहीए का?"

"अरे मला काय नेहमीच धाड भरते की काय? समोरच्या भाऊंचा फोन होता. नंदिनीताईंना जास्त झालंय..आपण बघू जाऊन."

"थांब नानी पैसे घेतो."

"अरे राजा, घेतले आहेत मी. तू चल. "

"कमुला उठवू?"

"वेडा क काय तू  दोन जीवांची ती निजूदेत तिला. मी रियाला उठवून कमूदीवर लक्ष ठेव म्हणून सांगितलय. तू चल बघू. हा बघ परत फोन करताहेत ते."

मधुने शर्ट घातला. लेंग्यावरच निघत होता. नानी म्हणाली पँट घाल. कुठे बाहेर जावं लागलं म्हणजे."

मधुला पटलं. दोघं तेरेदेसाईंच्मा घरी गेली. दार उघडंच होतं. नानीने आत जाऊन पाहिलं. उचक्या,आचके काहीच नव्हते. नंदिनी शांत निजली होती जणू. काही सेकंदात सगळं संपलं होतं. मधुला डॉक्टरांना बोलवायला पाठवलं. त्यांनी चेक करुन मयत डिक्लेअर केलं.

मधुची धावपळ सुरु झाली. तेरेदेसाईंच्या मुलाला त्याने फोन लावला व त्याच्या आईच्या निधनाची बातमी कळवली.

"इतक्यात तरी यायला जमणार नाही. तुम्ही सगळे आहात ना पपांसोबत. मी पैशाची व्यवस्था करतो," म्हणत होता. मधुला चीड आली..पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या तेरेदेसाईंच्या मुलाची. सोसायटीतली माणसं एकेक करुन गोळा झाली. मधुचे मित्र आले. तेरेदेसाईंचे काही नातेवाईक आले. नंदिनीचा अंतिम प्रवास सुरु झाला.

पहाटे नानी घरी जाऊन कमूला घेऊन आली. कमूने नंदिनीकाकूला डोळे भरुन पाहिलं. लहानपणापासून नंदिनीकाकूंनी तिला माया लावली होती. त्या नि तेरेदेसाई मग ते कोणत्या का कारणासाठी असेना पण कौमुदीच्या आईच्या निधनानंतर त्यांनीच तिला आधार दिला होता.

कालपरवाच तर कमूने नंदिनीकाकूचे इवलेसे केस विंचरुन दिले होते. त्यांच्या बागेतले लाल गुलाबाचे गेंद तोडून फ्लॉवरपॉट सजवला होता. कमू लवकरच आई होणार हे ऐकून नंदिनीही भलतीच खूष झाली होती पण दोन दिवसांत तिची तब्येत तिच्याशी नवा डाव खेळली होती.

तेरेदेसाईंना मुलाचा खूप राग आला होता. आपली चिडचिड ते कोणाकडे व्यक्तही करु शकत नव्हते. कार्य होताच तेरेदेसाई मित्राकडे चाव्या देऊन व्रुद्धाश्रमात रहावयास गेले.

कौमुदी खूप उदास झाली होती. आजी,रिया,मधू सारे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते.

----------------

ते निस्तरुन नानी जरा श्वास घेतेय तोवर शर्वरीचा फोन आला.
"नानी, आम्ही आय मिन आमची फ्यामिली नि भावाची फ्यामिली मनालीला आलोय."


"बरं. छानय की. मजा करा."

"नानी, मजा कसली सजा होतेय आमची. स्नोफॉलमुळे इथली वाहतूक बंद केलेय तात्पुरती न् तिथे तिथे दादा त्या दोघांना आयमीन ममीपप्पांना बाहेरून टाळं लावून आला होता. जेवण,चहासाठी फक्त खालचे केटरिंगवाले दरवाजा उघडायचे. त्यांच्याकडे चावी दिलेय."

"बरं मग."

" ते पपा टॉयलेटला म्हणून गेले ते आतच बसलेत. काही केल्या बाहेर येत नाहीएत. ममी हाका मारुन कंटाळली."

"अगं शेजाऱ्यांना बोलवायला सांग की."

"आमच्या मजल्यावर सगळे बाहेर गेलेत. बाकी कुणाचा नंबर नाही माझ्याकडे. ममीला फोन ऑपरेट करता येत नाही. केटरिंगवाल्याचा फोन स्वीच ऑफ येतोय."

"हे बघ शरु, तू घाबरु नकोस. मी बघते जाऊन नि कळवते."

नानी  मधुला घेऊन शर्वरीच्या ममीपप्पांच्या घरी गेली. केटरिंगवाल्याला जागं करुन टाळं खोललं. आतलं द्रुश्य विदिर्ण होतं. टॉयलेटच्या दाराच्या तोंडावर शर्वरीची मम्मी गुडघ्यात मान घालून बसली होती. टॉयलेटचा नळ धो धो वहात होता.

मधुने दार जोर लावून खोललं. टॉयलेट सीटवरच पपांचा डोळा लागला होता. मधुने त्यांना साफसुफ करून हॉलमधे आणलं. ममी रडतच होती.
"कसली सून नि कसली लेक घेऊन बसलात. या माणसाला विस्मरणाचा एवढा त्रास असताना ही पोरांना घेऊन मजा करायला गेलैत. दोघांनाही नको झालोय आम्ही."

नानीने सगळ्यांसाठीच चहा केला. डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनने पपांना झोप लागली.

ते चार दिवस नानी तिथे त्यांच्यासोबतच राहिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शर्वरीच्या पपांची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झाली होती. त्यांना मायेची,स्नेहाची,आधाराची गरज होती.


शर्वरी,निरंजन,शर्वरीचा भाऊ,वहिनी चार दिवसांनी आले.

शर्वरी अक्षरश: नानीच्या पाया पडली. "नानी, तुम्ही होता म्हणून."

नानी जरा कडक स्वरातच म्हणाली,"मी होते ठिकाय. पण, मी काय मधु काय नेहमीच अव्हेलेबल असू असं नाही ना. लाज नाही वाटली तुम्हाला आईवडलांना कोंडून ठेवून फिरायला जाताना. कुठेतरी आश्रमात तरी व्यवस्था पहायची होती त्यांची."

शर्वरीची वहिनी म्हणाली,"चुकलंच आमचं पण आम्हीही कंटाळलोय पपांच्या या दीर्घ आजारपणाला. दार उघडून कुठेही जातात. शोधणार कोण? उगा ममीच्या जीवाला घोर म्हणून ही ट्रीप एरेंज केली तेव्हा शर्वरीकडे या दोघांना ठेवायचा प्लान होता. तिला विचारलं तर आपण सगळेच जावू म्हणून हट्ट धरुन बसली. कुलपाची ,केटरिंगवाल्याकडे चावी द्यायची आयडीया शर्वरीचीच. विचारा तिला हवंतर."

शर्वरीने खाली मान घातली न् मुसमुसू लागली,"नानी, खरंच सॉरी. यापुढे मी ममीपप्पांना आपल्या ठाण्याच्या घरी घेऊन जाईन. वहिनीला थोडा आराम मिळेल. चांगल्या न्युरॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घे शरू. मला खात्रीय तुझे पप्पा नक्कीच सावरतील यातून." नानीने तिला समजावलं.

या प्रसंगानंतर शर्वरीचा नानीसंबंधातला द्रुष्टीकोन फारच चांगला झाला. ती स्वत:हून नानीला फोन करु लागली.

लॉचं पहिलं वर्ष रिया उत्तम गुणांनी पास झाली. तिने आजीच्या सांगण्यानुसार आईबाबांना रिझल्ट कळवला.
प्रथमेश बायकोसोबत आला. नानीचे हात हातात घेऊन म्हणाला,"नानी आम्ही झिडकारलेल्या आमच्या पोरीला तू नुसतं सावरलंस नाहीस तर ताठ मानेने जगात उभं केलंस. थोरली सून नानीच्या पाया पडली.

कमूला कळा येऊ लागल्या. तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. नानी तिच्या केसांवरुन, पाठीवरुन हात फिरवत राहिली होती. दोनेक तास बारीक बारीक कळा येतच होत्या नि मधेच एक जोराची कळ आली आणि बाळाचा जन्म झाला. एक नवं गोडगुलाबी लुसलुशीत टपोऱ्या डोळ्यांचं,गुलाबी ओठांचं,नाजूक जिवणीचं गाठोडं नानीच्या हातांत सिस्टरने दिलं. नानीच्या डोळ्यातून आनंद वहात होता. मधू कमूच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

कमूचा बाळ अगदी कमूचे डोळे घेऊन जन्माला आला होता.

नानीच्या बंगल्यासमोर आज रांगोळी काढली होती. गेटवर लायटींग केली होती. आप्तांना बोलावणं पाठवलं होतं. नानीचा वाढदिवस न् बाळाचं बारसं असा दुग्धशर्करा योग होता. मोगऱ्याच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात बाळराज मुठी चोखत पहुडला होता. रियाने आत्याच्या नात्याने त्याचं नावं ठेवलं. कुर्र कुर्र कौमुदीचा कौशल..कौशल.. बाळ गोड हासला.

संध्याकाळी नानीला मोतिया रंगाची साडी नेसवली,दोन्ही सुनांनी मिळून नानीला नटवलं. ताटात दिवे ठेवून नानीचं औक्षण केलं. मुलानातवंडांच्या सानिध्यात नानीने केक कापला. प्रथमेश,निरंजन,दोन्ही सुना,नातवंडांनी, कौमुदीने नानीला केक भरवला.

आपापसातले हेवेदावे मिटले होते. नानीचा उत्तरार्ध सुखात जाणार होता.

समाप्त.


नमस्कार🙏

वाचकहो,तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाने खरंतर कथा बहरत गेली. माझी खात्री आहे,तुम्हाला एका आजीची ही गोष्ट नक्कीच आवडली असेल.
असाच लोभ असावा. खूप साऱ्या शुभेच्छा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट