गोष्ट एका आजीची (भाग तिसरा)
गोष्ट एका आजीची (भाग तिसरा) निरंजनची लेक,जाई इयत्ता सातवीतली पण अजुनतरी स्वभावाने प्रांजळ होती. नानी आवडायची तिला. नानीचं नि तिचं बरं पटायचं. पण अजून एप्रिलच चालू असल्याने निरंजन बावचळला. "अगं,नानी जुनमधे आणतो न् तुला!" "का? मला तुम्हाला पहावसं वाटलं तर मी थोडं आधी आले तर नाही का चालणार!" -------------------------------------------------- नानीच्या या प्रश्नावर निरंजनला काय बोलावं ते समजेना. तो हडबडला. निरंजनची बायको शर्वरी हीने निरंजनकडे एक रागीट कटाक्ष टाकत त्याच्या हातातला रिसिव्हर जवळजवळ हिसकावून घेतला. ती नानीला समजावण्याच्र्या सुरात म्हणाली..."अहो,आई आम्हांला कशी अडचण होईल तुमची! तुमचंच घर आहे. कधीही येऊन रहा पण न् माझे मम्मीपप्पा आलेत सध्या. एकतर टुबीएचकेचं घर. एक बेडरुम मम्मीपप्पांना,एक आम्हाला..तुमची तशी नाही म्हंटलं तरी गैरसोयच होईल हो तेंव्हा जुनमधे आम्ही तिघंही येतो तुम्हांला न्यायला." 'मम्मीपप्पा आले की सासूने येऊ नयेसं कुठे असतं! मी निजले असते हॉलमधे..त्यात काय एवढं. मलाही बरेच दिवस झालेत तुझ्या मम्मीपप्पांना भेटून. ...